बातमी

बाबा का ढाबा प्रकरणात नक्की चुकी कुणाची? कोण खरं कोण खोटं?

सोशल मीडिया मधे खूप ताकद आहे असं म्हणतात, पण त्यामधून गरजू लोकांचं भलं होत असेल तर त्या गोष्टीचं कौतुक हे झालच पाहिजे. ही खरी घटना दिल्लीमधल्या मालविया नगर मधे राहणाऱ्या ८० वर्षाच्या कांताप्रसाद आणि त्यांची पत्नी बदामीदेवी यांची. हे दोघे मिळून गेले तीस वर्षांहून जास्त दिल्ली मधे ‘बाबा का ढाबा’ चालवत आहेत. घरी बनवलेले सात्विक अन्न, त्यामधून त्यांची मिळकत जेमतेम दुसऱ्या दिवसाची चिंता मिटवेल इतकीच होती.

पण या कोरोनामुळे ती परिस्थिती आणखी बिकट झाली, आणि ग्राहकांची संख्या त्याहून कमी. अगदी अन्न मिळणं देखिल कठीण झालं होतं त्यांच्यासाठी. आणि मग ७ ऑक्टोबरला एक युट्युबर गौरव वासान ने त्यांचा एक व्हिडिओ बनवला आणि तो इतका व्हायरल झाला की, सगळं चित्रच पालटलं. आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा कांताप्रसाद आणि त्यांची पत्नी बदामीदेवी सकाळी ८.३० वाजता आपल्या दुकाना जवळ आले तेव्हा, अगोदरच सगळे ग्राहक त्यांची वाट बघत उभे होते.

त्यांना विश्वास बसत नव्हता जे घडत होते त्यावर. मग नंतर असे काय झाले की धन्यवाद बोलून न थकणारे शब्द अचानक ‘हमने उससे कोई मदत मांगी नही, ना हम उसके पास गये थे, वो खुद हमारे पास व्हिडिओ बनाने आया’. हो हेच शब्द आहेत त्या बाबांचे ज्यांनी त्या यूट्यूबरच्या विरोधात पोलिस तक्रार नोंदवली. इथे प्रश्न कोण बरोबर कोण चुकीचं याचा नाहीच मुळी, पण जर तुम्हाला कोणी मदत केली असेल तीही न मागता त्याला जशी जमेल तशी आणि ज्या पद्धतीने करता येईल तशी आणि कदाचित त्याला हे देखिल माहीत नसेल की तो व्हिडिओ इतका व्हायरल होईल.

प्रश्न चूक बरोबरचा नाहीच पण वरचं वाक्य जरा जास्तच उद्धट होतं, म्हणजे हे तर असं झालं की, आपण कोणासाठी तरी काहीतरी केलं आणि ती व्यक्ती म्हणते की मी तर नव्हतं सांगीतलं मला मदत कर म्हणून.
विचार करा हे वाक्य अजून किती लोकांना थांबवेल कोणाची तरी मदत करण्यापासून असं होऊ नये हीच आशा. खूप सारे असे लोक आहेत जे असं बोलत असतील की त्या मुलाचं बरोबर आहे किंवा त्या बाबाचं बरोबर आहे, आपल्याला त्यात पडायचं देखिल नाही पण या घटनेनंतर कोणीही कोणाची मदत करण्यापासून थांबू नका, या जगात असे खूप लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, या किंव्हा कोणत्याही कारणावरून तुमचा तो निर्णय कधीच बदलू नका.

कोण चुकलं यापेक्षा कदाचित काय चुकलं त्याकडे आपण जरा लक्ष देऊया! जसं की जे पैसे त्यांना मदत म्हणून दिले गेले होते ते, एक गोष्ट नेहमी लक्षात असूद्या आपण जर कोणाला पैशांची मदत करत असू तर ते पैसे नक्की योग्य व्यक्तीला पोहचत आहेत की नाही? त्याला त्या पैशांची खरच गरज आहे की नाही? त्या व्यक्तीला तितक्या पैशांची गरज आहे की नाही? कारण आपण जी मदत करतोय ती योग्य हातांमध्ये पोहोचणं ही तितकंच महत्त्वाचं आहे.

या आणि अशा खूप गोष्टी पडताळून पहायची गरज असते. आणि आणखी एक चूक अशी झाली की, त्या बाबांना जर मदत करायचीच होती तर पैशांची करण्यापेक्षा ते जे अन्न विकत होते ते विकत घेऊन त्यांना मदत करणं जास्त गरजेचं होतं, पण तसं झालं नाही काही दिवसातच लोक फक्त सेल्फी काढण्यासाठी तिथे येत होते त्यांना तिथून विकत असे काही घ्यायचे नव्हते. सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही जर मदत करत असाल तर पडताळून पाहणं तितकंच गरजेचं आहे. लेखन : सायली सकपाळ

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *