विचारधारा

मोठे होता होता या गोष्टी तुम्हालाही जाणवल्या का

किशोर वयातून, प्रौढ वयात येताना खूप गोष्टींबद्दल आपल्याला कुतूहल वाटते, खूप गोष्टींची जाणीव होते. लोक कळायला लागतात आपले कोण, परके कोण ते कळते. जग कसं आहे, आपल्या कुठुंबाशिवाय जास्त महत्वाचे कोणच नसते, या आणि अशा खूप गोष्टी.

प्रत्येक व्यक्तीनुसार या सगळ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात, त्यांचे अनुभव वेगळे असू शकतात. त्यांच्या स्वभावात झालेला बदल हे देखिल त्याचाच एक भाग आहे. आपल्या जीवनाला वळण देणारं हे वय आहे. या वयात आपण घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आपल्या भविष्यावर होणार असतो.

सगळ्यात मोठी जाणीव होते ती म्हणजे जबाबदारीची. स्वतः बद्दलची जबाबदारी, आपल्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी. आणि आणखी ही अशा जबाबदाऱ्या ज्यामधून आपण कधीच गेलेलो नाही. आपल्या पुढील आयुष्याबद्दलचे महत्वाचे निर्णय ही आपण याच वयात आल्यावर घेतो.

दुसरी आणि महत्वाची गोष्ट ही जाणवते की, आपण घेतलेल्या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो. प्रत्येक निर्णय हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. आपलं एकच आयुष्य आहे आणि ते किती महत्वाचं आहे हे देखिल आपल्याला समजतं. आपण घेतलेल्या निर्णयाचा आपल्या आयुष्यावर चांगला किंव्हा वाईट परिणाम होतो, त्यामुळे निर्णय योग्य घेणं किती महत्वाचे आहे हे कळते.

आणखी एक जाणीव होते ती म्हणजे, आपण आता मोठे होत आहोत. आपण च काय आपल्या आजू बाजूचे लोक, आपली भावंडं, आपले मित्र मैत्रिणी सगळेच. ही भावना थोडी नवीन असते आपल्यासाठी आणि थोडीफार वेगळी देखिल. आपण मोठे होत आहोत ही जाणीव तर असतेच मात्र त्यासोबत आपले आई वडील आता म्हातारे होत चालले आहेत ही देखिल जाणीव आपल्याला होते.

मोठे होत असताना खूप नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, ज्या गोष्टींची आपल्या अगदीच कल्पना नसते. मग अशा वेळी काही निर्णय चुकतात, काही चुका आपल्या हातून घडतात, मात्र चूक झाली म्हणून तिथेच अडकून न पडता ती सुधारायची कशी आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी कशी घ्यायची याकडे लक्ष दिले पाहिजे.

योग्य काय, अयोग्य काय हे कळणे देखिल तितकेच महत्वाचे आहे. कधी आपल्या चुकांमधून तर कधी अनुभवांमधून आपण हळू हळू ते शिकतो. लेखन सायली सपकाळ.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *