काही लोकांना बोलायला सुरुवात कशी करावी? काय बोलावे? हेच सुचत नाही. तर काही लोकांना समोर असलेल्या व्यक्तीशी बोलण्यापेक्षा स्वतःशीच बोलावे असे वाटते. आणि त्यात गैर असे काहीच नाही. काही लोकांना समोरच्याशी बोलताना खूप प्रश्न पडतात, की या व्यक्तीला जर समजलेच नाही की, मला नक्की काय बोलायचे आहे? त्यामागे माझा हेतू काय आहे? माझे म्हणणे काय आहे? मला जे बोलायचे आहे ते तसेच्या तसे समोरच्या पर्यंत पोहचेल की नाही?
असे खूप प्रश्न असतात मनात, आणि म्हणूनच काही लोक व्यक्त होत नाहीत. आणि काही लोक फक्त स्वतःशीच सगळ्या गोष्टी बोलतात. तर अशा लोकांसाठी काही गोष्टी ज्यांच्या मार्फत ते स्वतःशी संवादही साधू शकतील आणि नको त्या गोष्टींवर अती विचार करणंही बंद होईल.
जर तुम्हाला लॉटरी लागली अगदी बक्कळ पैशांची तर तुम्ही काय कराल? आता आयुष्यात जे करत आहात ते पुढेही करत राहाल की त्यामधे काही बदल घडतील? काही लोक जे काम करतात ते फक्त पैसा कमविण्यासाठी नसते, तुम्ही कोणत्या लोकांमधे मोडता?
तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटतो? मग त्यामधे काहीही असू शकते, तुम्ही ठरवलेले एखादे काम जे तुम्ही पूर्ण केले आहे किंवा अशी एखादी कोणतीही गोष्ट ज्यामुळे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल.
एक शेवटचा प्रश्न असा जो कदाचित तुम्ही स्वतःला विचारला नसेल, मग तो नक्की विचारा. आपल्या जीवनाचा उद्देश्य काय आहे, आपल्या आयुष्याचा हेतू काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी मिळवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करू शकतो? हे सगळे प्रश्न स्वतः ला नक्की विचारून बघा, आणि प्रयत्न करा की त्यांची उत्तरंही तुम्हाला मिळतील.