विचारधारा

सौंदर्य रंगावरून का ठरवले जाते?

सौंदर्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, पण ती ज्याची त्याने ठरवावी. कोणीतरी आपल्या रंगावरून आपण किती सुंदर आहोत हे कसे काय ठरवू शकते. रंग गोरा आहे म्हणून सुंदर आणि सावळा आहे म्हणून कुरूप हा नियम कोणी बनवला आणि का? ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

आपल्याला कळत देखिल नाही की, आपण एखाद्याला दिसण्यावरून बोललो तर त्याचा त्यावर किती परिणाम होत असतो. काही लोक तर एखाद्या लहान मुलीला तिच्या रंगावरून बोलतात आणि मग ती लहान असल्या पासूनच आपल्या रंगाचा न्यूनगंड ठेवते, त्यामुळे कुठे ना कुठे तिच्यामधला आत्मविश्वास कमी होतो.

पण हा रंगाचा फरक आताचा नाहीच, तो तर वर्षानुवर्षे चालत आला आहे. अगदी इंग्रज आणि त्यांच्याही अगोदरच्या काळापासून. गोरा रंग कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा एकही प्रयत्न वाया जाऊन दिला जातं नाही. अगदी देव आणि दानवांमधला फरक जरी दाखवायचा असेल तरी रंगाचा आधार घेतला जातो, देव असतील तर त्यांचा रंग गोरा आणि दानव असतील तर ते काळे.

इंग्रजांनी जेव्हा आपल्यावर राज्य केले तेव्हा जवळ जवळ त्यांनी या गोष्टी आपल्या मनावर ठाम रुतवल्या होत्या की, कसा गोरा रंग श्रेष्ठ आहे आणि तोच इतरांवर राज्य करू शकतो, फक्त इंग्रज च नाही, मुघल, पर्शियन सगळ्यांचेच असे मत होते की, गोरा रंग इतरांवर राज्य करू शकतो.

इतकंच काय या रंगावरून तर जतीदेखील ठरवल्या जायच्या, एखादी व्यक्ती रंगाने गोरी असेल, उजळ असेल तर ती वरच्या जातीची, आणि ज्या व्यक्तीचा रंग या उलट असेल तर तो खालच्या जातीचा. कारण तसे स्पष्ट होते, जे लोक खालच्या जातीचे होते ते लोक कष्टाचे काम करायचे, दिवसभर रानावनात उन्हामध्ये त्यामुळे त्यांचा रंग तसा होता आणि त्याउलट वरच्या जातीचे लोक जे जास्तीत जास्त वेळ घरातच असायचे. त्यामुळे जातीचा आणि रंगाचा जर कोणता संबंध असेल तर तो फक्त हा एकच आहे.

भारतातच काय इतर देशांमधेही हे सगळे चालते जसे की, अठराव्या शतकात युरोपमधील लोकांनी सगळ्यांना या गोष्टीबाबत विश्वास पटवून दिला होता की, गोरा रंग काळ्या रंगावर राज्य करण्यासाठीच बनला आहे, त्यांचा तो हक्कच आहे आणि त्यांना तसे करणे भाग आहे. हे एवढे सगळे स्पष्टीकरण फक्त आणि फक्त आफ्रिकेतील लोकांवर आपली हुकूमत असावी आणि त्यांचा आपल्याला छळ करता यावा यासाठी.

या सगळ्या गोष्टी तर खूप वर्षापूर्वीच्या आहेत म्हणून आताची परिस्थिती बदलली आहे असे नाही, अजूनही समाजात तेच चालू आहे, आपल्या जाहिराती मधून, आपल्या सिनेमा मधून आपल्या समोर हेच येत असते. आपल्या जाहिातींचा तर सगळ्यात मोठा वाटा आहे या रंगाच्या सौंदर्यावर.

खूप गोष्टी बदलत आहेत, विचार बदलत आहेत, सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. छोट्या छोट्या बदलांमधून च समाजात मोठे बदल घडतात आणि अशी आशा करूया की, तो बदल लवकरच दिसून येईल. लेखन सायली सपकाळ.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *